पुण्यातील विश्रामबाग वाडा

पेशवे म्हणले की समोर उभा राहतो तो भव्य दिव्य असा शनिवारवाडा! श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्यापासून सवाई माधवराव यांच्यापर्यंत सगळं पेशवे कुटुंब याच वाड्यात रहात होतं. शेवटचे बाजीराव हे १७९३ पासुन या वाड्यात राहु लागले. मात्र त्यांच्या मनात नेहमी एक भिती असे. या भितीतच १७९९ पर्यंत ते राहीले आणि यातुन बाहेर पडण्यासाठी शनिवारवाड्यापासून जरा लांब एका निवांत ठिकाणी एक नवीन वाडा बांधुन तिथे राहायला जायचं शे. बाजीरावांनी ठरवलं.

त्यानुसार कारभाऱ्यांशी बोलणी पेशव्यांनी सुरु केली आणि वाड्याचा एक आराखडा तयार केला.पुढे १७९९ साली पर्वतीवर दर्शनास जाताना सदाशिव पेठेत हरिपंत फडके यांची ‘मोतीबाग’ पेशव्यांनी पाहीली आणि ती त्यांना आवडली. मग रितसर प्रक्रिया पूर्ण करून ती बाग पेशव्यांनी फडक्यांकडून विकत घेतली. साधारण अर्धा हेक्टर एवढी ती जागा होती. त्या जागेत पेशव्यांनी पेशव्यांच्या इभ्रतीला शोभेल असा वाडा बांधायचं ठरवलं.

Vishrambaug Wada Pune Timings, Entry Ticket Fee, Opening & Closing Time,  Holidays & Phone Number - Pune Tourism 2023

त्यानुसार वाड्याच्या बांधकामासाठी एकुण एक लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले गेले.सन १८०१ मध्ये या वाड्याचा पाया खोदण्यास सुरुवात झाली आणि एका वर्षानी, १८०२ साली वाड्याचा पाया भरून पूर्ण झाला. त्यानंतर यशवंत होळकरांनी पुण्यावर हल्ला केला आणि त्यात पुण्यासोबतच त्यांनी शनिवारवाडा लुटला. त्या गडबडीत वाड्याचे बांधकाम वर्षभरासाठी मागे पडले. १८०३ साली सुरुवातीला कारभाऱ्यांनी वाड्याच्या कामात पुन्हा लक्ष घातले. वाड्याचे काम पुन्हा सुरु करण्यास त्यांनी दाजी सुतार यांना सांगितले. १८०३ ते १८०७ त्यांनी वाड्याचे काम केले, मात्र त्यानंतर त्यांच्याकडून ते काढुन घेण्यात आले. पाया खोदण्यापासून आतापर्यंत पेशव्यांनी वाड्यावर ३०००० रुपये खर्च केले होते. त्यानंतर ते काम त्र्यंबकजी डेंगळे यांना देण्यात आले.त्र्यंबकजींनी वाड्याच्या निर्माणात लक्ष घातले आणि चार मजली आणि पाच चौकी वाडा त्यांनी निर्माण केला. अगदी बारीक नक्षीकाम वगैरे या वाड्याच्या बांधकामात केले गेले आणि अतिशय नियोजनबद्ध पद्धत या बांधकामात वापरली गेली.

विश्रामबाग वाडा

वाड्याच्या पश्चिमेस चार मजली चौघई, पुर्वेला आणि दक्षिणेला दुघई दोन मजली, उत्तरेला एक घई दोन मजली आणि चारी बाजुंनी सोपा बांधण्यात आला. मध्ये सप्तखणी चौरस करण्यात आला. या बांधकामात वापरलेले बीम्स, फरशी, खांब, वासे, सगळं काही नक्षीकाम केलेलं होतं. ह्यानंतर वाड्याच्या नैऋत्येला एक हौद बांधण्यात आला आणि त्यातून सगळ्या वाड्यात पाणी फिरवले गेले. यासाठी एकुण नऊ हजार खर्च आला. त्यानंतर मुख्य दरवाजा आणि पुढील भागाचे बांधकाम करण्यात आले. राजस्थानी पद्धतीचे अगदी आकर्षक असा दर्शनी भाग निर्माण केला गेला. हा एक मुख्य साचा उभा राहिल्यावर वाड्याच्या सुशोभिकरणास प्रारंभ झाला. वाड्यात सगळीकडे अगदी उंची वस्तू मांडण्यात आल्या आणि पेशव्यांना साजेसा ‘श्रीमंत’ असा वाडा तयार झाला. त्यानंतर वाड्याच्या पुढे बाग केली गेली आणि या वाड्याला ‘विश्रामबाग वाडा’ असे नाव शे. बाजीराव पेशव्यांनी दिले.

विश्रामबाग वाडा

वाड्यात दोन मुख्य महाल होते. एक गणेश महाल, जो राजकीय कामकाजासाठी वापरला जाई आणि दुसरा भवानी महाल, जो खाशांच्या करमणुकीच्या कार्यक्रमांसाठी वापरला जाई.असा दिमाखदार वाडा उभा राहिल्यावर या वाड्याची वास्तुशांत केली गेली आणि या विधीस ३५०० रुपये खर्च झाले. या नंतर आपल्या या ‘राजवाड्यात’ शे. बाजीराव पेशवे राहु लागले. आतापर्यंत या वाड्याच्या निर्माणास दोन लाख रुपये खर्च आला होता. पेशवे वाड्यात राहायला आल्या नंतरही या वाड्यात डागडुजीची बारीक सारीक कामे काही वर्ष चालूच होती.

पेशव्यांनी वाड्याच्या शेजारीच २५ हजार खर्चून एक तालीमखाना बांधुन घेतला. पुढेही १८१४ पर्यंत या वाड्यात सुखसोईची कामे चालू होती.श्रीमंत पेशव्यांचा हा दुसरा वाडा! दोन्ही वाडे ‘बाजीरावांनीच’ बांधले बरं!! एक वाडा.. शनिवारवाडा.. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी बांधलेला.. जो अगदी भव्य दिव्य होता.. त्याची भव्यता पाहूनच शत्रूच्या मनात धडकी भरावी! दुसरा वाडा.. विश्रामबाग वाडा.. शेवटच्या बाजीराव पेशव्यांनी बांधलेला.. जो आकाराने लहान असला तरी नक्षीकाम, कलाकुसर आणि सजावटीच्या जोरावर तितकाच आकर्षक!! या वाड्याचे दुर्दैव इतकेच की, हा जरी वैभवशाली असला, तरीही इथे राजकारणापेक्षा नाच गाण्याचेच फड जास्त रंगले. फक्त ‘विश्राम’ आणि रंगेलपणाच या वाड्यानी जास्त सोसला, पाहिला! वास्तूच ती!!

Vishrambaug Wada Pune Timings, Entry Ticket Fee, Opening & Closing Time,  Holidays & Phone Number - Pune Tourism 2023

१८०८ ते १८१७; ही फक्त नऊ वर्षे शे. बाजीराव या वैभवशाली वाड्यात वास्तव्यास होते.१८१८ साली पेशवाईचा अस्त झाला आणि या दिमाखदार वाड्यात इंग्रजांनी वेदपाठशाळा, टपालखाते, न्यायालय सुरु केले. पूना कॉलेजही काही काळ या ठिकाणी होते. १८६८ साली खंडोबाच्या माळावर पूना कॉलेज अर्थात डेक्कन कॉलेज स्थलांतरित झाल्यावर वाड्यातील पाठशाळा वगैरेही तिकडे हलविण्यात आले. १८७९ साली या वैभवशाली, श्रीमंत विश्रामबाग वाड्याला ब्रिटिशांनी आग लावुन दिली. त्यात वाडा बराचसा जळून खाक झाला. पुणेकरांना याचे फार वाईट वाटले. यामुळे त्यांना समाधान वाटावे म्हणुन नगरपालिकेस निधी गोळा करायला सांगितला आणि हा वाडा १९३० साली एक लाख रुपये किमतीत इंग्रज सरकारने नगर पालिकेस विकला. त्यानंतर तात्पुरती डागडुजी करून जरासा प्राण आणण्याचा प्रयत्न नगरपालिकेने केला.

सध्या या वाड्यात पुणे महानगरपालिकेने ‘पुनवडी ते पुण्यनगरी’ हे कायमस्वरूपी प्रदर्शन भरवले आहे. आपलं दुर्दैव हे की, पेशवाईतील वैशिष्ट्यपूर्ण एकही वाडा आपल्याला ब्रिटिशांनी पाहायला ठेवला नाही. असो..!

श्रेयस पाटील

अशाच विविध पोस्ट वाचण्यासाठी आमची कम्यूनिटी नक्की जॉइन करा..!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *